5/12/2012

मृत्युदाता -१४

भाग -१भाग -२भाग -३भाग -४भाग -५भाग -६भाग -७, भाग -८, भाग -९, भाग -१०, भाग -११, भाग -१२ आणि भाग -१३ पासून पुढे


रमेश गादीवर पडल्या पडल्या छताकडे पाहत स्वतःशीच विचार करत होता. 'आपण ज्या गोष्टीच्या मागे लागून सगळं सोडून इथपर्यंत आलो, ती गोष्ट खरंच इतकी महत्वाची आहे का? का आपण अजूनही ते सर्व आपल्या आयुष्यातून हद्दपार नाही करू शकत? आणि इथे येऊनही काय करतोय? कुठल्यातरी भुताचा पाठलाग करतोय असं वाटतंय? आणि त्यातही इथे जे सर्व सुरू आहे त्याचा काय अर्थ आहे? कमिशनर कोल्हेच्या विरोधात आणि कोल्हे आपल्या विरोधात पण आपण कोल्हेच्याच बाजूनं आहोत असं सांगून आपल्याला पाठवलंय. स्वतः जास्त तपास करता येत नाहीये कारण कोल्हे पुरावे नष्ट करतोय मग करायचं काय आहे नक्की? कशासाठी आपण सगळं पणाला लावलं? का बसलेली घडी विस्कटून टाकली? का तत्वांना मुरड घातली? आणि का त्या दोन विधवांच्या अपराध्यांच्याच बाजूनं लढायला उतरलो?'
थोडाफार कमी झालेला निद्रानाश पुन्हा बळावण्याची चिन्ह होती. त्या संध्याकाळी रमेश कमिशनरना त्यांच्या समारंभात भेटून आला होता. एका कोपर्‍यातल्या टेबलावर बसून त्यांनी रमेशशी वर्तक केसबद्दल काही गोष्टींवरून चर्चा केली, मग कोल्हेबद्दलचं रमेशचं मत आजमावलं आणि त्याचबरोबर त्याच्या मुख्य कामामधल्या प्रगतीबद्दलही चौकशी केली. प्रत्येक वाक्यामध्ये ते रमेशला काहीतरी सूचित करू इच्छित होते आणि रमेशच्या ते बरोबर लक्षात येत होतं. रमेशला पूर्ण चाचपूनच त्यांना रमेशवर विश्वास ठेवता येणार होता, त्यामुळे ते फुंकून फुंकून पावलं टाकत होते. रमेशही त्यांना हवे ते संकेत बोलण्यातून पुरवत होता. जवळपास तासभर अशा प्रकारे गेल्यावर त्यांनी सकाळी आठ वाजता त्यांच्या ऑफिसात बोलावलं. कोल्हे अर्थातच दहाशिवाय ऑफिसात येत नसल्यानेच ती सोय केलेली होती.
रमेशनं मोबाईल उचलून वेळ पाहिली. रात्रीचे अडीच वाजत होते. अजून किती वेळ विचार आणि झोपेचा लपंडाव चालणार होता ह्याचा अंदाज बांधत तो झोपायचा क्षीण प्रयत्न करू लागला.


-----


नरेंद्र रेखाच्या डोळ्यांत पाहत होता.
"आता बोलशील?" रेखानं शांतता भंग केली.
"ह्म्म्म. मी कल्पनासोबत काम करत होतो. जवळपास तीन वर्षांपूर्वीपर्यंत."
"म्हणजे?"
"म्हणजे, त्यानंतर मी हे सोडून निघून गेलो."
"पण ती तुला शंकर का म्हणते? तू एकेकाळचा नक्षलवादी असल्याचं तर मलाही ठाऊक होतं, पण तुझं नाव..."
"रतन असायला हवं राईट."
"ह्म्म."
"तो एकप्रकारचा इन्शुरन्स होता."
"म्हणजे?"
"मी ओरिजिनल नक्षलवादी नव्हे. सहसा सारे नक्षलवादी हे लोकल, जन्मल्यापासून किंवा अगदी कोवळ्या वयात ह्यांच्यात आलेले असे असतात, मी मात्र बाहेरून आलो होतो. त्यामुळे मला माझी निष्ठा सिद्ध करायची होती. त्याअंतर्गत ह्यांच्यातल्या एका ज्येष्ठ गुप्तहेराची आयडेंटिटी पोलिस रेकॉर्ड्समध्ये मी घेतली. खरा रतन सहदेव सेफ झाला आणि मी नक्षलवादी फोल्डच्या बाहेर पडू शकणार नाही ह्याची शाश्वती झाली."
"मग तरी का सोडलास तू ह्यांचा गट?"
"लीडरसोबत मतभेद झाले माझे."
"म्हणजे कल्पनाबरोबर?"
"नाही. कल्पना तेव्हा लीडर नव्हती."
"पण झालं काय होतं?"
नरेंद्रनं दोन क्षण शून्यात पाहिलं. "कुणाला मारायचं आणि कशासाठी मारायचं ह्यावरून आमचे मतभेद झाले होते."
खोलीत दोन मिनिटं शांतता पसरली.
"पण मला बरंच काहीकाही सांगायचं आहे म्हणत होतास, त्यामध्ये कुणाकुणाला मारलं ते ही आहे का?"
"नाही. पण ऐक जरा माझं. माझी अख्खी कहाणी मी तुला सांगत राहिलो तर बराच वेळ जाईल, त्यापेक्षा आपण इथनं आधी बाहेर पडूया."
"एक मिनिट, एक मिनिट. पण तू आधी म्हणालास की तू आयएसआयसोबत काम केलं आहेस."
"नॉट एक्झॅक्टली आयएसआय. मी जावेदसोबत काम केलं होतं. आणि तो आयएसआयचा माणूस आहे हे मला ठाऊक नव्हतं. पण नक्षलवादी आणि आयएसआय बर्‍याचदा एकमेकांसोबत काम करतात हे सत्य आहे." आणि एकदम साक्षात्कार झाल्यागत तो स्वतःशीच म्हणाला. "ओह, आता लक्षात आलं. म्हणून कल्पनाला मी कुठे आहे ते कळलं."
"म्हणजे ती आयएसआयसोबत काम करतेय?"
"तितकं साधंसरळ नसतं सगळं. काहीवेळा काही माहितीची देवाणघेवाण होते. काही पर्सनल फेव्हर्स असतात. खूप गुंतागुंतीचं आहे सर्व."
"अरे पण देशाशी गद्दारी?"
"नक्षलवादी देशभक्त म्हणून प्रसिद्ध नाहीयेत."
"म्हणजे कल्पना.." रेखानं थोडं घाबरून विचारलं.
"नाही नाही. ती आपल्याला काही हार्म करणार नाही हे नक्की."
"आपल्याला नव्हे, तुला. माझ्यावर तर ती खार खाऊनच असेल."
"ते का?"
"तिला वाटतं की तुझं माझ्यावर.." आणि रेखा बोलता बोलता थांबली.
नरेंद्र काही बोलला नाही. तो जागेवरून उठला आणि खोलीच्या भिंतींचा अंदाज घेऊ लागला.
"इथे कुठे बग्ज, व्हिडिओ कॅम्स असतील का रे?"
"शक्यता कमी आहे, कारण ही राहत्या जागेची एखादी खोली आहे. कुणातरी मेंबरचं घर बहुतेक." नरेंद्र भिंतींची ताकद तपासत होता.
"माझंच घर आहे शंकर." रेखा आणि नरेंद्रनं चमकून दरवाज्याकडे पाहिलं, तिथे कल्पना उभी होती. ती आत आली आणि रेखाच्या समोर बसली. नरेंद्र जागीच उभा राहून लक्ष देऊ लागला.
"मी एव्हढी मूर्ख नाही शंकर की तुम्हा दोघांना रात्रभर एकत्र ठेवेन. तू काही ना काही उपद्व्याप करशील आणि रक्तपातही होऊ शकतो. त्यामुळे हिला मी माझ्यासोबतच ठेवेन." कल्पना रेखाकडे पाहत म्हणाली.
"काय?" नरेंद्रला अचानकच काही सुचेनासं झालं.
रेखा काहीही न बोलता कल्पनाकडे पाहत होती. त्या दोघू जणू नजरेनंच एकमेकींशी बोलत होत्या. तेव्हा दरवाजातून दोन बंदूकधारी स्त्रिया आत आल्या. त्यांनी बंदूका खांद्याला अडकवल्या आणि रेखाच्या शेजारी उभ्या राहिल्या. रेखा उठून उभी राहिली. तिनं नरेंद्रकडे पाहिलं. तो दोन पावलं पुढे झाला तशी त्या स्त्रियांनी बंदूकांना हात घातला. कल्पनानं नको म्हणून खूण केल्यावर त्या थांबल्या. नरेंद्र जागच्याजागीच थांबला. त्या दोघीजणींनी रेखाला खूण केल्यावर ती दरवाजाच्या दिशेनं चालू लागली. कल्पना नरेंद्रकडे पाहत होती. पण तो एकटक रेखाकडे पाहत होता. दरवाजात पोचल्यावर तिनं वळून एकदा नरेंद्रकडे पाहिलं. त्या दोघांची नजरानजर झाली. नरेंद्रनं एक क्षण कल्पनाकडे पाहिलं आणि तो धावतच रेखाजवळ गेला. रेखा तिथेच थांबली.
"तुला माझ्याबद्दल सगळं तर सांगता येणार नाही चटकन. पण एक खरं सांगतो. तिला जे वाटतं, त्यात तथ्य आहे." तो कल्पनाकडे अंगुलीनिर्देश करत म्हणाला.
रेखाला काहीच समजेनासं झालं. तिला नक्की काय वाटत होतं हे तिलाच कळत नव्हतं.
कल्पनानं इशारा केल्यावर त्या स्त्रिया तिला हाताला धरून ओढू लागल्या.
"आणि माझं खरं नाव विवेक आहे." तो तिचा हात धरत म्हणाला. "पण तू मला जे म्हणतेस तेच म्हण ह्यापुढेही." आणि त्यानं तिचा हात सोडला.
रेखाला काहीतरी बोलायचं होतं, पण तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. ती तशीच त्या दोघींच्या जोरानं चालत राहिली.


-----


"ह्म्म. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कोल्हेनं सगळ्या संशयितांकडून त्याच टेप्स वापरून ब्लॅकमेल करून पैसे उकळलेत." रमेश कमिशनरांच्या ऑफिसात बसून बोलत होता.
"होय. मी ह्याच संशयिताच्या मदतीनं इतरांकडून माहिती काढली." सिन्नरकर इंगोलेचं पत्र फडफडवत म्हणाले.
"हे चुकीचं नाही वाटत तुम्हाला?" रमेश म्हणाला.
"कोल्हे करतोय ते बरोबर आहे?" कमिशनर म्हणाले.
"तुमचा इंगोलेवर इतका का विश्वास आहे."
"कारण इंगोले माझा मित्र आहे. आणि ज्या रात्री इंगोलेची ही टेप बनवली गेली आहे. त्यारात्री तो माझ्यासाठी स्टिंग ऑपरेशन करायला तिथे गेला होता. पण त्याला ड्रगचं इंजेक्शन दिलं गेलं आणि आमचा प्लॅन फसला."
"पण तुम्ही कमिशनर असूनही ह्यामध्ये स्वतः का इन्व्हॉल्व्ह झाला आहात?"
"मी फक्त नावाचा कमिशनर राहिलोय रमेश." सिन्नरकर हताशपणे म्हणाले. "मंत्री आणि इतर विकले गेलेले नोकरशहा मिळूनच सगळा कारभार हाकतात. मी स्वतःच्या करियरवर बट्टा लागू नये म्हणून गप्प बसून सर्व पाहत राहिलो. कशात मिसळलो नाही, पण प्रतिकारही केला नाही. पण आताशा साक्षात्कार होतोय. माझं प्रतिकार न करणं म्हणजे त्यांना साथ देण्यासारखंच होतं. त्यामुळे जेव्हा ह्या शर्मा आणि क्षीरसागर मर्डर केसमध्ये परत एकदा वरून दबाव यायला सुरूवात झाली, तेव्हा मी स्वतःच्या पद्धतीनं तपासाला सुरूवात केली."
"ह्म्म. पण ह्या सगळ्याशी माझा काय संबंध?"
"तुम्ही मला वेगळे वाटता रमेश."
"मीही वरच्यांकडूनच आलो आहे."
"तरीदेखील. काहीतरी आहे ज्यामुळे तुम्ही हे करताहात. तुम्ही मुळात कोल्हेसारखे नाही. मी तुमची सर्व माहिती काढली आहे."
"तुम्हाला जे वाटत असलं ते खरं जरी असलं, तरी त्यामुळे काही बदलत नाही."
"मला फक्त एकदाच ह्या लोकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडायचेत. ही केस दबू द्यायची नाहीये. कोल्हेला उघडा पाडायचाय. बस एव्हढा एकच विजय हवाय. मी त्यानंतर राजीनामा देईन सुखासमाधानानं."
"सॉरी साहेब. पण मी कोल्हेसोबत काम करायच्या ऑर्डर्स घेऊन आलोय." रमेश उठत म्हणाला.
"पण कोल्हे तुमच्यासोबत काम करतोय का?" कमिशनर असं म्हणाल्याबरोबर रमेश थांबला.
"म्हणजे?"
"उगाच वेड पांघरू नका रमेश. मी नावाचा कमिशनर असलो तरी सगळ्या बातम्या ठेवतो. कोल्हे तुम्हाला कायम लूपबाहेर ठेवतो आणि तुम्हाला बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो."
रमेश काहीही बोलला नाही.
"तुम्ही इथे काय करायला आला आहात ह्याच्याशी माझं देणंघेणं नाहीय रमेश. हेल्प मी ब्रिंग कोल्हे डाऊन. कदाचित हे काम करताना तुम्हालाही काही हवे ते क्ल्यूज मिळतील."



रमेश कमिशनरांच्या ऑफिसातून बाहेर आला तेव्हा सकाळचे साडेनऊ होत होते. त्यानं कमिशनरांकडून मिळालेल्या एका नंबरवर फोन लावला.


-----


"काळजी नको करूस तिची. ती माझ्याच खोलीत राहील, माझ्याबरोबर." कल्पना असं म्हणाल्यावर नरेंद्र मागे वळला आणि काही न बोलता खोलीच्या एका कोपर्‍यात जाऊन बसला.
"मला काय वाटतं शंकर?" कल्पना नरेंद्रच्या शेजारी जाऊन बसली.
नरेंद्र काहीही बोलला नाही.
"तू रागावला आहेस का माझ्यावर?"
नरेंद्र तरीही काही बोलला नाही.
"चल काही हरकत नाही. तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं ह्यातच सर्व आलं."
"कल्पना."
"काय?"
"ते कधीच जमलं नसतं कल्पना. कधीच काहीच जमणार नाहीये."
"काय बोलतोयस तू?"
"हेच. तू आणि मी. किंवा मी आणि कुणीही. मी नॉर्मल नाहीये."
"कुणी कुणावर प्रेम करावं हे ठरवणारा तू कोण? आणि तरीही तू तिच्यावर प्रेम करतोसच ना?"
दोन क्षण नरेंद्र शांत बसला. "खूप गुंतागुंतीचं आहे सर्व. आणि चुकीचं. मी नको ते सर्व करतोय. सगळे फासे उलट पडताहेत."
"तुझा रागही विक्षिप्त आहे. तू रागावला आहेस हेही कुणाला कळणार नाही." ती त्याचा मूड ठीक करायचा प्रयत्न करत म्हणाली.
"मी तेव्हा तुला सोडून गेलो, त्याचंही हेच कारण होतं. मी नॉर्मल नाहीये. माझं शरीर मानवी आहे. आतून मी फक्त पशू आहे."
"बरं. सोड तो विषय. तू काही ऐकायचा नाहीस."
कल्पनानं दरवाज्यातल्या बंदूकधार्‍यांना इशारा केल्यावर त्यातला एकजण बाहेर गेला आणि दोनच मिनिटांनी एक मध्यम उंचीचा मध्यमवयीन मनुष्य खोलीत शिरला. त्याचे केस लांब होते, दाढीमिश्याही वाढलेल्या होत्या पण चेहरा सामान्य होता, चेहर्‍यावर क्रौर्य नव्हतं. साधेसे शर्ट पँट घातलेला असा तो जेव्हा आत आला, तेव्हा नरेंद्रनं वर पाहिलं. त्यांची नजरानजर झाली आणि नरेंद्र उठून उभा राहिला.
"मला वाटलंच होतं." नरेंद्र कोरडेपणानं म्हणाला.
"तुला वाटतंय तसं नाहीये. तुझ्या आत्ताच्या ठावठिकाण्याबद्दल मला वल्लभकडून काहीही कळलं नव्हतं. वल्लभ फक्त जेलमधून बाहेर पडेपर्यंतच तुझ्याबद्दल मला कळवत होता. त्यानंतर तो तुझ्यावर नजर ठेवू शकला नाही. यू आर टू गुड." कल्पना मधेच म्हणाली.
कल्पना आणि वल्लभ नरेंद्रच्या समोर बसले.
"तू शांत बसणार नाहीस ह्याची मला कल्पना आहे आणि तिला तुझ्यापासून वेगळं ठेवून तुझी अजून तडफड मला करायची नाही. तिथे तीदेखील काही शांत नसेल. त्यामुळे उद्या सकाळी मी तुम्हाला सोडेन."
"त्यासाठी ह्याला कशाला बोलावलं आहे इथे?" नरेंद्र वल्लभकडे पाहून तुच्छपणाने म्हणाला.
"शंकर, मी कसलाही दगाफटका केलेला नाही तुझ्याबरोबर." वल्लभ नरेंद्रला म्हणाला.
"अच्छा? जेलमध्ये राहून माझ्या खबरा पोचवणं हे अजून काय आहे?"
"शंकर, जेलमध्ये बरेचदा तुझा जीवही वाचवायचं काम केलंय त्यानं."
नरेंद्र दोन क्षण पाहत राहिला. "मी आत्महत्या करत असताना माझा जीव वाचवणं हे कुठल्या ऍंगलनं क्वालिफिकेशन ह्या सदरात मोडतं?"
"तुझ्यावर खुनी हल्लेही झाले होते शंकर." कल्पना तरीही म्हणाली.
नरेंद्र काही बोलला नाही.
"सोड ते सर्व. आणि वल्लभ शांत राहा आता." ती पुढे बोलू लागली. "वल्लभ तुमच्याबरोबर पुढे येईल."
"तुला खरोखर असं वाटतं की मी ह्याला माझ्यासोबत ठेवेन?"
"शंकर, फक्त इथून भुवनेश्वरपर्यंत. पुढे वल्लभ तुझी ट्रेल बनवेल, म्हणजे आयएसआय त्याच्या मागावर जातील आणि तू तुला जिथे हवं तिथे जा. वल्लभला आयएसआयची चांगली माहिती आहे."
"माझ्या मागावर फक्त आयएसआय नाहीये."
"होय. मला माहित आहे ते. पण मी जेव्हढं करू शकते तेव्हढं करते आहे."
"कशासाठी पण?"
"तुला नाही समजायचं." म्हणून ती उठली आणि बाहेर पडली. तिच्यामागोमाग वल्लभही बाहेर पडला.



त्यादिवशी बर्‍याच दिवसांनी नरेंद्रच्या मनात वादळ उठलं होतं. त्याला स्वतःच्याच मनाचा थांग लागत नव्हता. तो काय करत होता, काय बोलत होता आणि कुठे निघाला होता, कशाचाच त्याला अंदाज येत नव्हता. अशा वेळेस हमखास कामी येणारा उपाय त्यानं करायचं ठरवलं. तो जमिनीवर आडवा झाला आणि डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करू लागला.


-----


रमेश चहाच्या टपरीजवळ चहा पित उभा होता. तेव्हा एक कळकट कपडे घातलेला मेकॅनिकसारखा दिसणारा मनुष्य तिथे आला. तो टपरीशेजारी उभा राहून चहा पिऊ लागला. रमेश मेकॅनिकवर बारीक लक्ष ठेवून होता. रमेशनं पाचच्या नोटेसोबत एक लहानसा कागदही टपरीच्या उंचवट्यावर ठेवला आणि चालू लागला. थोड्या अंतरावर जाऊन एका गाडीमागे उभा राहून तो टपरीकडे लक्ष देऊन पाहू लागला. मेकॅनिकनं हळूच त्या नोटेवर स्वतःची नोट ठेवत कागद उचलला आणि तो वळला तर समोर रमेश उभा होता. आणि रमेशच्या हातात पिस्तुल होतं.


-----


"रमेश माझ्या प्रत्येक पावलात अडथळा आणतोय साहेब." कोल्हे फोनवर बोलत होता.
"लहान मुलासारखे तक्रार करू नका कोल्हे." पलिकडून आवाज आला.
"साहेब. मी इथे तुमचीच कामं करतोय."
"तुम्ही अजून काय काय करताय ते ही आम्हाला ठाऊक असतं कोल्हे."
कोल्हे शांत झाला.
"रमेशही आमचंच काम करतोय. त्यामुळे आमच्यापासून लपवण्यासारखं जर तुम्ही काही करत नसाल तर तुम्हाला काळजीचं कारण नाही."
"ह्म्म."
"आणि पित्रेसाहेबांच्या कामाचं काय झालं?"
"होतंय साहेब. लवकरच निकाली काढतो ते ही."

क्रमशः

No comments:

Post a Comment