3/13/2012

मृत्युदाता - ८

भाग  -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५, भाग -६ आणि भाग -७ पासून पुढे


"अपहरण?" रेखाच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला, "काय बोलतोयस तू?"
"होय. अपहरण." नरेंद्रनं बॅगेतून स्टनगन ऊर्फ टेझर बाहेर काढला. "हे वापरून बरंच सोपं होईल."
"कुठून आणलंस हे? आणि ठेवणार कुठे आहेस महातोला? आणि महत्वाचं म्हणजे उचलणार कसं मुळात?"
"शांत हो आधी." नरेंद्र स्टनगन टेबलावर ठेवत म्हणाला, "सगळं सांगतो. आधी चटचट तयार हो. आपल्याला महातोच्या ऑफिसकडे जायचं आहे."
"आणि जेवणाचं?"
"रस्त्यात घेऊ काहीतरी. चल."
"आणि कपडे काय घालू?"
"आता काय समारंभाला चाललोय का आपण? कोव्हर्ट ऑपरेशनसाठी जे घालायचे तेच घाल."
"अरे म्हणजे तू मला डिस्ट्रॅक्शन म्हणून वापरणार आहेस का? म्हणून विचारलं."
"ओह्ह. राईट. पण आज आपण रात्रीच्या वेळेस फक्त पुरूषमंडळी असलेल्या ठिकाणी चाललो आहोत, त्यामुळे सुंदर स्त्रीचं डिस्ट्रॅक्शन योग्य नसतं. कारण त्यांना ती सुंदर स्त्री जास्तीत जास्त वेळ तिथेच राहावी असं वाटतं आणि मग त्यासाठी ते काहीही करू शकतात. मग तिचं परत निघणं रिस्की होऊन बसतं. म्हणून आज आपण बेवड्याचं डिस्ट्रॅक्शन घेऊ. नकोशा व्यक्तिंचं डिस्ट्रॅक्शन बेस्ट असतं, त्यांना घालवण्याचा सगळेच आटोकाट प्रयत्न करतात." असं म्हणत त्यानं एक शर्ट आणि पॅंट जमिनीवर टाकून मळवायला सुरूवात केली.
"आणि मी काय करायचं?"
"काहीही नाही. त्याऑफिसकडे व्यवस्थित लक्ष ठेवता येईल असा जवळच्याच एका बिल्डिंगमधला एक स्पॉट मी पाहून ठेवलाय. तिथे दुर्बिण घेऊन तू बसायचंस आणि मी तिथे धिंगाणा घालायला गेलो की त्यांचा सिक्युरिटी रिस्पॉन्स कसा होतो त्यावर लक्ष ठेव."
"पण जर त्यांना जराही संशय आला तर ते तुला पकडतीलच ना."
"इतकं सरळ नाहीय. ते आधी अंदाज घेतील की मी जेन्युईनली घोळ घालतोय का? आयडियल सिक्युरिटी टीम अशा वेळेस सर्व एक्झिट्स कव्हर करते आणि ते डिस्ट्रॅक्शन नाही ना हे चेक करते. आणि इतर कुठलाही धोका नाही ह्याची खात्री पटून ते निश्चिंत झाले की मग ते मला बाहेर काढतील. उगाच प्रिझनर्स घेण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो."
"मग आपल्याला नक्की काय हवंय?"
"त्यांचा सिक्युरिटी रिस्पॉन्स कसा होतो, ह्यावरून नक्की कुठल्या मजल्यावर किती महत्वाच्या गोष्टी आहेत ह्याचा अंदाज येतो. हवं असलं तर व्हिडिओशूटिंग करून ठेव संपूर्ण ऍक्टिव्हिटीचं."
"आणि त्याचा काय उपयोग?"
"पुढे कामाला येईल ही माहिती."

-----

"एसीपी विशाल कोल्हे रिपोर्टिंग सर." सिन्नरकरांनी वर पाहिलं.
"या. या. यू कम हायली रेकमेंडेड एसीपी." सिन्नरकर चेहर्‍यावरची रेषही हलू न देता म्हणाले.
"सर." कोल्हेनं हलकं स्मित दिलं.
"हे शहरात झालेले दोन हाय प्रोफाईल मर्डर्स आहेत." सिन्नरकर फाईल्स पुढे करत म्हणाले, "आम्ही केसेस उभ्या करू शकत नाहीये, त्यामुळे पित्रेसाहेबांनी तुम्हाला पाठवलं आहे." सिन्नरकरांच्या आवाजात खोच होती.
"आय विल डू माय बेस्ट सर." कोल्हेसाठी हे नवीन नव्हतं.
त्यानं फाईल्स उचलल्या.
"आत्तापर्यंत ह्या केसेसवर डीवायएसपी तिवारी काम करत होते. त्यांच्यासोबत तुमची मीटिंग ४ वाजता ठेवली आहे, इथेच माझ्या ऑफिसात. ते तुम्हाला ब्रीफ करतील आणि हँडओव्हरही. तोवर ह्या फाईल्स पाहून घ्या.. हवालदार तुम्हाला तुमचं ऑफिस दाखवतील."
कोल्हे सॅल्यूट मारून निघून गेला. सिन्नरकर खिडकीबाहेर हताशपणे पाहत होते.

-----

"आता काय?" रेखा सूपचा एक घोट घेत म्हणाली.
"आता काही नाही, उद्यापासून तीन दिवस आपल्याला महातोच्या दिनक्रमावर लक्ष ठेवायचं आहे. सहसा माणसं रूटीनची गुलाम असतात, त्याच्या रूटीनचा अभ्यास करूनच आपल्याला त्याचं अपहरण करण्याच्या प्लॅन बनवता येईल."
"आणि ह्या व्हिडिओटेपचं काय?"
"त्याचा अभ्यास तर करूच, पण सकाळी तो ऑफिसला यायच्या वेळेस आणि तो निघताना अशा दोन वेळेस ऑफिसची एकंदरित हालचाल टिपणे हे तुझं काम राहिल."
"आणि तू त्याचा पाठलाग करणार का?"
"मग अजून कोण करणार?"
"कमॉन, काहीतरी बोलायचं म्हणून बोलले."
"हो कळलं ते मला." तो सिरियस असला की त्याच्या चेहर्‍यावरची रेषही हलत नसे.
"आणि बाकी वेळ काय करायचं?"
"मला शहरामध्ये एक उत्तम जागा शोधायची आहे आणि तुला त्या कागदांवर लिहिलेला कोड सोडवता येतो का ते पाहायचं आहे."
"ह्म्म."
तो उठताना एकदम कळवळला.
"त्यांनी जोरात मारलं काय रे खूप?"
"कितीही सवय असली तरी मुका मार दुखतोच." तो हळूच म्हणाला आणि त्या चायनीजच्या गाडीवाल्याला पैसे दिले आणि चालायला लागला. ती कसल्याशा विचारात गढून सवयीनं त्याच्यामागे चालायला लागली.

-----

"साहेब, आपण तुमच्या घरी न बसता इथे हॉटेल बुक करून का अभ्यास करतोय ह्या पुस्तकाचा?" शिंदे पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर पेरिमीटर चेकसाठी एक नजर टाकून म्हणाले.
"कारण माझं घरदेखील बग केलं गेलेलं आहे."
"काय? मग आता?"
"मग काय? असू देत की बग्ज, बग्ज असताना काय बोलायचं आणि काय नाही ह्याचा मला पूर्ण अंदाज आहे. म्हणूनच ह्या केसशी रिलेटेड कुठलीही गोष्ट मी घरी करत नाही."
"पण मग तुमच्यावर कुणाचातरी वॉचही असू शकतो."
"तितकी हिंमत नाहीये त्यांची, किंवा मी अजून तितका मोठा धोका झालेलो नाही. कारण अजूनतरी माझ्या सराईत नजरेला कुणी माझा पाठलाग करत असल्याचं जाणवलेलं नाहीये."
"पण कुणीतरी उच्च दर्जाचा प्रोफेशनल असला तर?"
"ह्म्म. बघू. इतकं पॅरानॉईड होणं मला परवडणारं नाहीय."
"ह्म्म ते ही आहेच. पण ह्या पुस्तकाचं काय पुढे?"
"काही कळेना झालंय मलाही. सगळ्या घड्या, सगळे मार्किंग्ज दहा दहा वेळा पाहिले. डॉ. कुर्लेकरांनाही दाखवलं. पण ते मार्किंग्ज आधी ज्यांनी पुस्तक घेतलं असेल, त्यांच्यापैकीही कुणी केलेले असतील. काहीच कळायला मार्ग नाही. वेड्यासारखं ह्यामध्ये क्ल्यू शोधण्यात वेळ दवडणं मला ठीक वाटत नाहीये."
"मग?"
"आता आपल्यासाठी पुढचा रस्त खुद्द खुनीच दाखवेल." रमेश डोक्यात काही गोष्टी पक्क्या करत म्हणाला.
"ते कसे?"
"ह्या पुस्तकावर सखोल चर्चा आज रात्री आपण माझ्या घरी करूयात." रमेश डोळे मिचकावत म्हणाला.
"पण ह्या पुस्तकात प्रत्यक्षात काही क्ल्यू नसलाच तर?"
"कसंही असलं तरी खुन्याला ते माहित असणं अशक्य आहे. त्याला काळजी घ्यावीच लागेल."
"पण हे धोकादायक नाही वाटत? कारण कव्हरअपसाठी पोलीस ऑफिसरचं घर बग करण्यापर्यंत ज्यांची मजल गेलीय, ते लोक किती पॉवरफुल असतील, ह्याची कल्पनाच केलेली बरी."
"धोकादायक आहेच आणि म्हणूनच तुम्ही माझ्या घरी येणार नाही आहात. मी तुमच्याशी फोनवर चर्चा करणार आहे आणि त्या चर्चेसाठी तुम्हाला मी एक फोन देईन, तो चर्चा संपल्यावर लगेच डिस्पोज ऑफ करून टाकायचा."
"साहेब.."
"आय अंडरस्टँड शिंदे. पण तुमचं कुटुंब आहे, जवाबदार्‍या आहेत."
शिंदे काही बोलले नाहीत.
"चला आता निघायला हवं, जाता जाता तुम्ही एक नजर काळेंच्या घरावरून टाकून जा आणि मी एक नजर राजेंच्या घरावरून टाकून जातो."

-----

"एनी लक?" नरेंद्र अंगावरचा कोट उतरवत म्हणाला.
"तुला तो कोट घालूनच बाहेर जावं लागतं का रे?"
"फाईव्ह स्टार हॉटेल्सचा व्यवस्थित अभ्यास करायचा म्हणजे व्यवस्थितच राहावं लागतं."
"फाईव्ह स्टार हॉटेल? पण तू त्याला होस्टेज ठेवण्यासाठी जागा शोधत होतास ना?"
"यप्प! आपण त्याला हॉटेल ट्युलिप ग्रूव्हमध्ये होस्टेज ठेवणार आहोत. बेस्ट सिक्युरिटी सिस्टम्स आणि सॉफ्टवेअरवर कमी डिपेन्डन्सी म्हणजे माझ्यादृष्टीनं व्हल्नरेबल, पण कुठल्याही इतर सिक्युरिटी ग्रुप्ससाठी टफ."
"आर यू इन्सेन?"
"अजिबात नाही. सगळा अभ्यास यथास्थित झालाय."
"पण मग त्याला आत नेणार कसं?"
"न्यायची गरज नाही, तो स्वतः येईल आत."
"आणि ते कसं?"
"त्यासाठी आपल्याला तुझी मदत लागेल."
"पुन्हा तेच?" ती वैतागून म्हणाली.
"नाही, ह्यावेळेस फक्त काही फोन कॉल्स."
"??" तिच्या चेहर्‍यावरची अनेक प्रश्नचिह्न त्याला दिसली आणि तो फक्त हलकंसं हसला.
"ते सगळं आपण नंतर बघू सविस्तर. आधी तुला त्या कागदपत्रांचा काही अर्थ लागला का ते सांग."
"वैताग आहे तो. पण सांग ना आपण त्याला उचलत का नाही आहोत थेट?"
"कारण तू त्याची सिक्युरिटी सिस्टम तीन दिवसांपूर्वी पाहिली आहेस."
"हो पण तू तर कॉन्फिडन्ट होतास एकदम."
"होय. पण तो रूटीन फॉलो करणारा माणूस नाहीये. त्याला असलेल्या धोक्यांची संपूर्ण कल्पना आहे, म्हणून तो रँडमली दिवसाचं रूटीन ठरवतो. त्याचे सिक्युरिटी गार्ड्स उत्तम ट्रेन्ड आहेत. मीसुद्धा एकदा त्यांच्यातल्या एकाच्या नजरेस पडता पडता वाचलो."
"का, तू काय मोठा तीसमारखाँ आहेस?"
"ते जाऊ दे. तर तो किडनॅपिंग आणि प्राणघातकी हल्ला ह्यांपासून वाचण्याची पूर्ण काळजी घेतो. आणि त्याची सिक्युरिटी खुद्द त्याच्या बायकोचा बाप पाहतो."
"काय?"
"होय. तो एका हॉटशॉट पॉलिटिशियनचा जावई आहे."
"कपाळ माझं. कसं करणार आहोत हे आपण?"
"एक्झॅक्टली हेच आपण आपल्या फायद्याकरता वापरणार आहोत." बोलताना नरेंद्रचे डोळे चमकत होते, "एव्हरीथिंग इज प्लॅन्ड."
"ह्म्म." तिनं हातातले कागद खाली ठेवले आणि पंखा लावायला उठली.
"कागदांची काही प्रोग्रेस?" त्यानं परत विचारलं.
"असती तर मी अजूनपर्यंत बोलले नसते?" ती थोडीशी वैतागली होती.

-----

"साहेब, तिवारींनी केलेलं ब्रीफिंग वगैरे ठीक आहे. पण मी स्वतंत्रपणे काम करतो हे तुम्हाला ठाऊक असेलच. त्यामुळे मला कुणीही मदतीला नकोय." कोल्हे मीटिंगनंतर सिन्नरकरांशी बोलत होता.
"होय, तुमच्या सर्व गरजा थेट पित्रेसाहेंबाकडूनच माझ्यापर्यंत पोचल्या आहेत." सिन्नरकर तुटकपणे म्हणाले.
"ठीक तर मग. उद्यापासून मी माझ्या पद्धतीने तपास सुरू करेन. पहिल्या मर्डर सस्पेक्टची कस्टडी एक्स्टेंड करण्यासाठी प्रोसिजर सुरू करेन, त्यावर मला तुमची सही लागेल. आणि दुसर्‍या केससाठी मला काही सर्च वॉरंट्स लागतील. पेपरवर्क मी तुमच्याकडे पाठवून देईन." कोल्हेचं सगळं वागणंच अतिशय आत्मविश्वासपूर्ण होतं.
"बरं."
कोल्हे सॅल्यूट मारून निघून गेला. आणि सिन्नरकर पुढे उद्भवणार्‍या धर्मसंकटांना कसं सामोरं जायचं ह्या विचारांमध्ये गढून गेले.

-----

शिंदे आणि रमेशचं शेवटचं बोलणं झाल्याला तीन दिवस उलटले होते. रमेशची सिक लीव्हही त्यादिवशी संपत होती. रमेशचा कुठेही काहीही पत्ता नव्हता. घरचा फोन कुणी उचलत नव्हतं आणि मोबाईल स्विच्ड ऑफ होता. शिंदे रमेशच्या घरीही तीनचारदा जाऊन आले होते. त्यादिवशी मात्र त्यांचा पेशन्स संपला. त्यांनी मोबाईल कंपनीला रमेशचं सिमकार्ड ट्रेस करायला सांगितलं आणि सुपिरियरला रिपोर्ट करायला म्हणून ते गेले, तर रमेश तिथेच बसला होता.
"सॉरी शिंदे, मी आधी साहेबांना भेटायचं म्हणून इथे आलो." रमेशला शिंदेंचा चेहरा पाहताक्षणी त्यांची घालमेल लक्षात आली.
"येस शिंदे?" डीसीपी तवटेंनी शिंदेंना विचारलं.
"काही नाही सर, साहेबांचा पत्ता लागत नव्हता तीन दिवस झाले तरी, आणि फोनही लागत नव्हता. म्हणून फोन कंपनीला सिमकार्ड ट्रेस करायला सांगितलं, ते तुम्हाला रिपोर्ट करायलाच इथे आलो होतो."
"काय? अहो शिंदे रमेशची लीव्ह आज संपतेय. त्याला लीव्हमध्ये तरी स्वस्थ बसू देणार का? आधी तो ट्रेस मागे घ्या बरं."
"असू दे साहेब. त्यांना काही मोठं काम पडत नाही. घेतील मागे नंतर." रमेशनं रदबदली करायचा प्रयत्न केला.
"बरं एनी वे शिंदे. उद्यापासून तुम्हाला इन्स्पेक्टर दिवेकरांना रिपोर्ट करायचं आहे."
"कोण इन्स्पेक्टर दिवेकर?" शिंदेंना आश्चर्याचा धक्काच बसला.
"आपल्या स्टेशनातले नवे इन्स्पेक्टर."
"का? आणि साहेब?" शिंदेंना काही समजेनासं झालं होतं.
"साहेब आता मोठे साहेब झालेत." तवटे हसत हसत म्हणाले, "रमेश हॅज बीन टेकन इन बाय सीबीआय. आता तो तुरूंगातनं पळालेल्या चार कैद्यांची केस पाहणार आहे."
शिंदेंना काही बोलायचं सुचलंच नाही, ते केवळ रमेशकडे पाहत राहिले. रमेश नजरेनंच त्यांना काही सांगू पाहत होता.

क्रमशः

No comments:

Post a Comment