5/06/2012

मृत्युदाता -१३


 भाग -१भाग -२भाग -३भाग -४भाग -५भाग -६भाग -७, भाग -८, भाग -९, भाग -१०, भाग -११ आणि भाग -१२ पासून पुढे

रेखा आणि नरेंद्र जीपच्या मागच्या सीटवर दोन बंदूकधारींसोबत बसले होते. जीप दहा-पंधरा मिनिटांतच कच्च्या रस्त्याला लागून जंगलात शिरल्यासारखी वाटत होती.
"ही दीदी कोण?" रेखानं एकदम नरेंद्रला विचारलं.
दीदीचा उल्लेख ऐकताच बंदूकधार्‍यांनीही कान टवकारले. नरेंद्रनं तिच्याकडे पाहिलं. मग क्षणभर त्यानं काही विचार केला.
"रेखा, ट्रेनमध्ये मी तुला काहीतरी सांगणार होतो. काहीतरी महत्वाचं!"
"मी तुला दीदीबद्दल विचारलं." रेखा थोडीशी चिडली होती.
"तेसुद्धा त्यातच आलं असतं."
"म्हणजे तू दीदीला ओळखतोस."
नरेंद्रनं एक उसासा सोडला. "होय. ते तुला ज्यापद्धतीनं हे लोक मला टोकत म्हणाले, त्यावरूनच कळलं असेल. पण त्या कथेत अजून बरेच तपशील आहेत आणि ते सर्व तुला सांगण्याच्या इराद्यानंच मी तुझ्याकडे परत येत होतो. तेव्हाच हे सगळं घडलं."
"ह्म्म." रेखानं उपहासानं म्हटलं.
"अपना मुंह बंद रखो अब। बहुत बोल लिये।" ड्रायव्हरशेजारी बसलेल्यानं मागे बंदूक रोखत म्हटलं, "और तुम दोनों क्या बॉडीगार्ड हो इनके? ठीकसे कंट्रोल करना सीखो होस्टेजेस को!" तो रागानं मागच्या सीटवरच्या दोघांना म्हणाला.
ते दोघे वरमले. नरेंद्रनं एकदाच पुढे बसलेल्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि त्या बंदूकधार्‍यानं चटकन नजर वळवली. रेखानं नरेंद्रची ही नेत्रपल्लवी पाहिली आणि ती काहीच घडलं नसल्याचा आविर्भाव करून गप्प बसून राहिली. तिला आता कशावरच विश्वास उरला नव्हता.

-----

रमेश पोलिस मुख्यालयात शिरत असताना त्याला मोठी धावपळ दिसू लागली. काय झालं असावं ह्याचा अंदाज बांधतच तो कोल्हेच्या जागेकडे गेला, पण कोल्हे जागेवर नव्हता. त्यानं एक-दोन हवालदारांना कोल्हेबद्दल विचारलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. रमेशला काय करावं ते सुचत नव्हतं. तो कमिशनरांच्या केबिनकडे गेला.
"अपॉईंटमेंट आहे?"
"त्यांना सांगा स्पेशल ऑफिसर रमेश आलेत म्हणून." रमेशनं आयकार्ड दाखवलं.
दोनच मिनिटांत त्याला आतून बोलावणं आलं.
"बसा ऑफिसर. काय काम काढलंत?" सिन्नरकर रमेशला बसायची खूण करत म्हणाले.
"ऍडव्होकेट वर्तक आणि क्षीरसागर, दोघांच्याही बायका काल रात्रीच कुठेतरी गेल्यात. आणि त्या कुठे गेल्यात ह्याचा कुणालाही पत्ता नाहीये." रमेश म्हणाला.
"काय? दोघी एकत्रच?" सिन्नरकरांनाही हलकासा धक्का बसला.
"घरून वेगवेगळ्याच निघाल्या, पण पुढे काहीच नाही."
"मग?"
"मग काही नाही साहेब. त्या वॉन्टेड नाहीत, त्यामुळे आपण काहीही करू शकत नाही."
"वेल. हा योगायोग असू शकत नाही."
"नक्कीच नाही. दोघी एकत्र?"
"तेव्हढंच नव्हे.."
"मग?"
"तुम्ही ऐकलं नाही का अजून? ऍडव्होकेट वर्तकनं काल रात्री जेलमध्ये आत्महत्या केली."
"काय?" रमेश उडालाच.
"म्हणूनच ही धावपळ सुरू आहे. दुपारी मला पत्रकार परिषद घ्यावी लागणार आहे. मोठा इश्यू होणार असं दिसतंय. पण तुम्हाला काय हवं होतं?"
"काही मुद्द्यांबद्दल खात्री करायची होती."
"पण मला वाटलं की तुम्ही कोल्हेंच्या तपासावर स्वतःचा तपास करणार आहात."
"योजना तशी होती, पण माझ्या सोडून कुणाच्याच तपासावर मी विश्वास ठेवत नाही." रमेश बोलून गेला.
सिन्नरकरांचे डोळे क्षणभर चमकले.
"यू नो मिस्टर रमेश, उद्या मी एका समारंभाला चाललो आहे. तुम्हीदेखील का नाही येत तिथे. केसबद्दल अजून बोलता येईल. आत्ता मला खरोखरच वेळ नाहीये. हा मुद्दा राजकीय होतोय यू सी." सिन्नरकर त्याला नजरेनं चाचपत म्हणाले.
"ह्म्म. ओके सर. ऍज यू विश." अन तो मोबाईलवर कोल्हेचा नंबर फिरवत तिथून बाहेर पडला.

-----

नरेंद्र आणि रेखाला एका खोलीत बसवण्यात आलं. दोन बंदूकधारी खोलीच्या दरवाज्यापाशी उभे राहून त्यांच्यावर पाळत ठेवून होते.
"रेखा. तुला माझ्याबद्दल बरंच काही माहित नाहीये."
"ते दिसतंच आहे."
"पण तुला खरंच ते माहित असण्याची काहीच गरज नव्हती, म्हणूनच मी काही बोललो नाही."
"का गरज नव्हती?"
"कारण मी आपल्या प्लॅनमध्ये मी फक्त एक हिटमॅन होतो."
रेखानं त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि मग विचारात गढून गेली. तो पुढे बोलतच होता.
"तू जेव्हा माझ्याशी प्लॅनबद्दल बोलायला लागलीस, तेव्हा माझ्याबद्दल सगळी माहिती तुला असल्याचं म्हणालीस. मी फक्त मान डोलावली. कारण मला खरोखरच सत्य सांगायची गरज वाटली नाही."
"मग आता का वाटते आहे?"
"कारण अशा घटना घडत चालल्यात की माझ्याबद्दल ते सर्व जे तुला कधीच माहिती नव्हतं, एक एक करून समोर येत चाललंय आणि मला भीती वाटतेय की तुझा माझ्यावरचा विश्वास उडेल." त्याचा आवाज जड झाला होता.
"हिटमॅनवर मी विश्वास ठेवेन का?" रेखाला खूप विचित्र वाटत होतं.
नरेंद्र फक्त समोरच्या भिंतीकडे एकटक पाहत होता. मग रेखानंच शांततेचा भंग केला.
"पण हे सगळं मला कधीच कसं कळलं नव्हतं?"
"कारण तू चुकीच्या माणसावर रिसर्च केलास."
"काय?"
"मी रतन सहदेव नाहीय."
"काय? मग? कोण आहेस तू?" रेखाला बसलेला हा सर्वात मोठा धक्का होता.
"खूप मोठी कहाणी आहे.." असं म्हणून तो बोलायला सुरूवात करणार, एव्हढ्यात कुणीतरी येण्याची चाहूल लागली.
खोलीच्या दरवाज्यातून एका पस्तिशीच्या स्त्रीनं प्रवेश केला. तिनं पंजाबी ड्रेस घातला होता. साधेसेच व्यवस्थित ठेवलेले खांद्यापर्यंतचे केस आणि छोटीशी टिकली कपाळावर होती. गव्हाळ वर्ण आणि तरतरीत नाक होतं. हसतमुख चेहर्‍यानंच तिनं नरेंद्रकडे रोखून पाहिलं, मग रेखाकडे पाहिलं आणि पुन्हा नरेंद्रकडे पाहून बोलायला लागली.
"बराच बदललास शंकर."
रेखानं नरेंद्रकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात ओळख होती.
"तू मात्र होतीस तशीच आहेस." नरेंद्र जागेवरून उठत पण कोर्‍या चेहर्‍यानंच म्हणाला.
तिनं बंदूकधार्‍यांना खूण केली आणि ते बाहेर निघून गेले. ती नरेंद्रजवळ आली आणि निरखून त्याचा चेहरा पाहू लागली.
"हे सर्व काय झालं?" त्याच्या कानाखालच्या व्रणांना हात लावत ती म्हणाली.
नरेंद्रनं तिचा हात झटकला आणि डोळ्याच्या कोपर्‍यातून रेखाकडे पाहिलं.
"ओह्ह." कल्पनानं रेखाकडे पाहत एक स्मितहास्य केलं. "पण तिला तरी.."
"कल्पना." नरेंद्रनं तिचं वाक्य अर्ध्यातच तोडलं. "कशासाठी आणलंय आम्हाला इथे?"
"ह्म्म." कल्पनानं एक पॉज घेतला. "संरक्षण करायला."
"मला संरक्षणाची गरज नाही." नरेंद्र थोडासा चिडला होता.
"कोण म्हणतं असं?"
"तुला ठाऊक आहे मी एकटाच कितीजणांना पुरेसा आहे ते."
"होय. पूर्ण कल्पना आहे मला. पण एकटाच."
"म्हणजे?"
"ही सोबत असली की तुझं काय झालं त्याचं प्रात्यक्षिक आत्ताच झालं नाही का?"
नरेंद्रनं रेखाकडे पाहिलं. "पण ह्या सगळ्याचं तुला काय पडलंय? आम्ही जगू, मरू."
"तुला कुणाचं पडलं नसेल रे. पण मला तुझं पडलंय." कल्पना दुखावलेल्या स्वरात म्हणाली आणि तडक बाहेर पडली.
"कल्पना.." नरेंद्र तिच्या मागे जाऊ लागला, पण दारातल्या बंदूकधार्‍यांनी त्याला परत आत पाठवलं.
नरेंद्र हताश होऊन खाली बसला. त्याची रेखाकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. ती स्वतःच उठून त्याच्यासमोर येऊन बसली. त्यानं मान उचलून तिच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत हजारो प्रश्न होते.

-----

रमेश कोल्हेसोबत शवागारात वर्तकच्या मृतदेहाशेजारी उभा होता. कॉरोनर आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट त्यांना तपशील देत होते. मृतदेह वर्तकचाच असल्याचं निश्चित होतं आणि ती आत्महत्याच असल्याचा निष्कर्ष फॉरेन्सिक एक्सपर्ट्सनी काढला होता.
"तुम्हाला खरोखर ही आत्महत्या वाटते?" रमेशनं कोल्हेला बाहेर पडताना विचारलं.
"माझ्या वाटण्या न वाटण्यावर काय आहे?"
"तुमच्या वाटण्या न वाटण्यावर तपासाची दिशा ठरते एसीपी."
"वेल. त्याच्या सेलमध्ये तेव्हा दुसरं कुणीही नव्हतं आणि फॉरेन्सिक्सनी त्याला दुजोरा दिलाय, त्यामुळे मला अजून काही करण्याची आवश्यकता वाटत नाही."
"ह्म्म. सेलमध्ये दुसरं कुणीही नव्हतं, हे तुम्ही नक्की कशाच्या आधारे सांगताहात?"
"जेलमध्ये सिक्युरिटी कॅमेरे आहेत, त्यांच्या टेप्सवरून."
"मला त्या टेप्स मिळू शकतील का?"
"का हव्या आहेत तुम्हाला? तुमचं काम ठरलेलं नाहीये का आधीच? नको तिथे कशाला नाक खुपसताय?" कोल्हे संतापू लागला होता.
"हे माझ्या केसशी रिलेटेड आहे." रमेश शांतपणानं म्हणाला.
"उद्या संध्याकाळपर्यंत मी क्लिअर करेन."
"आणि त्या बायकांबद्दल काही कळलं का?" रमेशनं त्याच स्वरात विचारलं.
"नाही. पण मी दोन माणसं लावली आहेत कामाला."
"कोण दोन माणसं? मी संपर्क करू शकतो का त्यांना?"
"कशाला?" कोल्हे भडकला होता.
"काही नाही, त्या दोघींकडून काही धागे मिळू शकतात का ह्या विचारात होतो."
"तुम्ही संपर्क साधू शकत नाही. आम्हाला काही मिळालं तर तुम्हाला कळवू." असं म्हणून कोल्हे त्याच्या गाडीकडे झटझट पावलं टाकत निघून गेला.
रमेशला काहीतरी शिजत असल्यासारखं वाटू लागलं. तो आणि कोल्हे एकाच बाजूनं होते खरंतर. मग त्याच्यापासून इतक्या साध्या साध्या गोष्टी लपवण्याचं काय कारण असू शकत होतं? ह्या विचारात रमेश पडला. कोल्हे काहीतरी भलताच गेम खेळत असल्याचा त्याचा संशय बळावू लागला. कमिशनरसोबतची भेटच आता नवीन काही बाजू दाखवू शकणार होती. त्यानं त्याची बाईक सुरू केली आणि तो क्षीरसागरच्या घराकडे निघाला.

-----

गाडीत बसल्याबरोबर कोल्हेनं फोन फिरवला.
"पित्रेसाहेब, हा रमेश कशासाठी आला आहे इथे? तो रतनला पकडायला आलाय की मला छळायला?"
"शांत व्हा कोल्हे. काय झालं एव्हढं?"
"साहेब, वरून ऑर्डर्स आल्या त्याप्रमाणे सगळं केलंय मी. पण हा इथेच फणा काढून बसलाय. माझ्या कामामध्ये लुडबूड करतोय. तो रतन इथनं जाऊन जमाना झालाय. कदाचित गुवाहाटीहूनही पुढे गेला असेल. पण ह्याला का अजून इथेच ठेवलाय. पुढची माहिती त्याला द्यायलाही मनाई करताहेत मला."
"कोल्हे. प्रत्येक पाळीव कुत्र्याला पट्टा हा बांधावाच लागतो. रमेश हा वरून पाठवलेला पट्टा आहे समजा."
"बस का साहेब?"
"तुम्ही ऐश करण्यात बिझी आहात. मग नजरेत आलं असेल कुणाच्यातरी." पित्रे अंदाज घेत म्हणाले.
"बस का साहेब आता. तुमची सगळी कामं करूनच्या करून आम्हीच पाळीव कुत्रे काय?"
"आता काय बोलायचं कोल्हे."
"काही बोलू नका हो. करा काहीतरी."
"तुम्ही आमची कामं करू नका. पण आम्ही तुमच्यासाठी सर्व करावं अशी अपेक्षा कशी बरं करता?"
"साहेब, तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम करतोय मी. वर्तक अन क्षीरसागर प्रकरण संपल्यात जमा आहे."
"आणि शशिकला?"
"साहेब. ती केस चिघळलीय. ज्या रिपोर्टरला शशिकलानं ती टेप दिली होती तिच्याशी हिची जवळीक झाली होती. आता ती रिपोर्टर सगळीकडे त्या गुंडांचा मागोवा काढत फिरते आहे."
"गुंडांचा?"
"म्हणजे तुमच्या माणसांचा. आणि त्यामुळे मी मॅनस्लॉटर म्हणून चटकन दाबू शकत नाहीये केस. तिनं सगळ्या पंचनाम्यांची चिरफाड केली आहे. क्राईम सीनचे फोटोज तिला कुठून मिळाले ते कळत नाहीये मला."
"हे बघा कोल्हे. ते सगळं आम्हाला सांगू नका काही. तुम्हाला तुमचा काटा मार्गातनं बाजूला काढून हवाय, तर आमचा काटा मार्गातनं काढून द्या." पित्रे दमात घेतच म्हणाले आणि त्यांनी फोन कट केला.
कोल्हे स्टेअरिंगवर हात ठेवून विचार करत राहिला.

-----

"हिचं एकेकाळी माझ्यावर प्रेम होतं." नरेंद्र रेखाकडे पाहत म्हणाला.
"एकेकाळी? ते तर अजूनही दिसतंय."
नरेंद्र काही बोलला नाही.
"आणि तुझं?"
नरेंद्र काहीच बोलला नाही.
"टिपिकल. पळाला असशील तिला टाकून."
नरेंद्रनं एकदम चमकून तिच्याकडे पाहिलं. "टिपिकल म्हणजे?"
"म्हणजे जसा तू आहेस. स्वतःपासून, स्वतःच्या भावनांपासून दूर पळणारा."
"एक मिनिट. सायकिऍट्री क्लासेससाठी वेळ नाहीये आपल्याकडे. इथनं बाहेर कसं पडायचं ते पाहायचंय."
"आणि बाहेर पडून करायचं काय आहे?"
"काय म्हणजे? वी हॅव सम पीपल टू किल.. आठवतंय?"
"कोणाला मारायचंय? संपलं ते सर्व कधीच. आपल्या मागावर न जाणे किती लोक आहेत आणि आपला शत्रू नक्की कोण आहे ते ही आपल्याला ठाऊक नाही."
"ठाऊक आहे." नरेंद्र तिच्याकडे पाहत म्हणाला. आणि त्यानं शर्टाखालून एक घडी घातलेला कागद बाहेर काढला. "ही लिस्ट."
"कसली लिस्ट?" तिनं त्याच्या हातातून कागद काढून घेतला.
"वर्तकच्या घरून जी फाईल मिळाली होती ते सर्व कोडमध्ये लिहिलेले कागद होते. जे महातोच्या लेटरहेडवर होते."
"ते मलासुद्धा माहितीय."
"पण प्रश्न एव्हढाच होता की तो कोड नक्की काय होता."
"मग तू त्याचा छळ करून तो काढलास."
"होय."
"ही लिस्ट म्हणजे नक्की काय आहे?"
"हे सर्व त्यांच्या हवाला रॅकेटचे लोक आहेत. ह्यामध्ये वर्तक आणि शर्माचीदेखील नावं आहेत आणि बरीच मोठमोठी नावं. आपल्यासमोर खूप मोठं काम आहे."
"हे पण?" रेखा चमकून म्हणाली.
लिस्टमध्ये बेळे-पाटलांचंही नाव होतं.
"होय. तीच गंमत आहे. मी ज्याला मारलं तो ही लिस्टमध्ये आहे आणि ज्यानं सुपारी दिली तोही लिस्टमध्ये आहे. म्हणूनच लवकर इथनं बाहेर पडायचंय आणि सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाय."
"नाही."
"का?"
"आधी मला तू स्वतःबद्दल सर्व काही सांगायचं आहेस. त्यानंतर जर मला तुझ्यावर विश्वास ठेवावासा वाटला तरच मी तुझ्यासोबत येईन. नाहीतर तुझे माझे रस्ते वेगळे आहेत."
"रस्ते वेगळे करून कसं चालेल?"
"का नाही चालणार? असाही हा माझा सूड आहे? तुझं काय आहे ह्यामध्ये?" तिनं चिडून विचारलं.
नरेंद्रनं मान खाली घातली.
"बरं. आता पहिल्यापासून सुरूवात कर."

क्रमशः

2 comments:

  1. Avani2:42 AM

    क्रमशः >>>>> ohh noooo

    ReplyDelete
  2. Ya kathech hero kon narendra ki ramesh?

    ReplyDelete